DONATE NOW

Tuesday, January 25, 2022

”आत्महत्याग्रस्त बटुळे कुटुंबातील भावंडांना आधारची मोलाची मदत”

 

      साधारण दोन वर्षे झालीत. वडील मल्हारी बटुळे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. उसतोडणी कामगार असलेलं कुटुंब रस्त्यावर आलं. घरातील वयोवृद्ध आजोबांवर कुटुंबाची जबाबदारी आली. विशेष म्हणजे प्रशांत तेंव्हा तिसरीतच होता. त्याने आपल्या स्वरचित कवितेतून शेतकरी दादाला आत्महत्या न करण्याची आर्त साद घातली. शेतकऱ्यांच्या कष्टाची कैफियत शब्दबद्ध केली. त्याचे दुर्दैवं असे त्याने कविता ज्या दिवशी सादर केली, त्याच रात्री त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती.

        ही बातमी वाऱ्यासारखी समाजात पसरली. वर्तमानपत्रात टिव्ही चैनल वर बातम्या आल्या. समाजातील अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केली. काहींनी मदतीचा हात पुढे केला, तर काहींनी फक्त पोकळ आश्वासने दिली.

        या सर्वांमध्ये एक फोन येऊन गेला. अनोळखी माणूस तिकडून बोलत होता व मला आधार संस्थेची माहिती सांगत होता. सर आम्ही समाजातील अनाथ, वंचित पिडीत, शोषित मुलांना दत्तक घेतो. त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारतो. जोपर्यंत ही मुलं शिकतात तोपर्यंत आधार ही संस्था त्यांना आधार देण्याचे काम करते.

        खरंचच विचार केला तर आधार म्हणजे काय हो? वंचित, शोषित, पीडितांना जगण्याची उमेद देणे म्हणजे आधार. त्यांना जीवनमार्ग दाखवणे म्हणजे आधार. त्यांच्या मनगटामध्ये कष्टाचे आणि मेंदूमध्ये सद्विचारांचे बळ भरणे म्हणजे आधार. ही सर्व कामे आधार ही संस्था अगदी निरपेक्षपणे, निस्वार्थीपणे पार पाडत आहे. गेल्या वर्षी आधार संस्थेने स्व.मल्हारी बटुळे यांच्या लेकरांना दिवाळी भेट व शैक्षणिक साहित्य पुरवले होते. या वर्षी दहा दिवसांपूर्वी रोख सात हजार रुपये आधार संस्थेने पाठवले. या पैशांमधून प्रिती, प्रमोद आणि प्रशांत यांना शैक्षणिक साहित्य, कपडे, शूज, अवांतर वाचनाची पुस्तके, स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तके देण्यात आली. या होतकरू लेकरांना आधारने दत्तक घेतले आहे.

        समाजातील वंचितांचा, पिडीतांचा आपण आधार बणूया. हा उदात्त, निर्मळ आणि प्रामाणिक विचार घेऊन आधार संस्थेमधील सर्व सदस्य निरपेक्षपणे काम करताहेत. त्यांना ना प्रसिद्धीची हाव आहे, ना मानसन्मानाची. त्यांचे स्थान गरजू विद्यार्थ्यांच्या काळजामध्ये कोरले आहे. जिथे गरज आहे तिथपर्यंत आधार पोहोचत आहे. प्रति महिना फक्त १०/- रुपये याप्रमाणे १२०/- रुपयांत एक वर्षाची मेंबरशिप आपल्यालाही घेता येते व ती आपण घ्यावी ही नम्र विनंती. या मदतीतूनच गरजू लेकरांना आधार देण्याचं काम आधार ही संस्था करत आहे या संस्थेच्या मदतीतूनच अनेक विद्यार्थी घडले आहेत, घडत आहेत व भविष्यातही घडतील.

      आधार संस्थेला  द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. बटुळे कुटुंबातील लेकरांच्या आयुष्यात आपण निर्माण केलेला प्रकाश एक दिवस नक्कीच चमकणार आहे. आपले पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

        

भगवान विद्यालय खरवंडी ता-पाथर्डी, अहमदनगर या विद्यालयात

प्रशांत- पाचवी

प्रमोद- सातवी

प्रिती- नववी

या वर्गात शिक्षण घेत आहेत.

 

श्री.लहू बोराटे सर.

No comments:

Post a Comment

निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!

We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.