Tuesday, January 25, 2022
"आधार शैक्षणिक दत्तक विद्यार्थिनीस मदत "
पायल संजय घोडेकर
12वी, सायन्स
ओहरा कॉलेज,संगमनेर
अतिशय, हुशार मुलगी
एका डोळ्याचे ३ आपरेशन झालेत. वडिलांनी लाखो रुपये खर्च केला. वडील
फिटर ...
चार वर्षापासून आधार दत्तक
पालक योजनेतून शिकते.
मागील वर्षी अक्षरभारती पुणे या संस्थेतर्फे तिला लॅपटॉप दिला. तिला
खूप अडचणी असताना, अभ्यासाची बरीच दिवस वाया गेलेले असताना दहावीला 88.89 % मिळाले.
चश्मा तुटल्याने व काचाही खराब झाल्याने तिला दिसायला अडचण आली होती.
"मला यावर्षी सॅक,शूज नको, त्याऐवजी चश्मा
नीट करून द्या." असं तीचं म्हणनं होतं. पायलची अडचण ओळखून तिला
नयन चश्मा संगमनेर येथून तात्काळ चांगल्या दर्जाचा नवीन चश्मा होलसेल
दरात घेऊन दिला.
पायलला स्पर्धा परिक्षेतून कलेक्टर व्हायचे आहे.आधार समुपदेशक डॉ.
चित्रलेखा, वैशाली ताई,पीएसआय मृणाल पवार यांचे सतत तिला मार्गदर्शन
मिळत आहे.
”आत्महत्याग्रस्त बटुळे कुटुंबातील भावंडांना आधारची मोलाची मदत”
साधारण दोन वर्षे
झालीत. वडील मल्हारी बटुळे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करुन आपली
जीवनयात्रा संपविली. उसतोडणी कामगार असलेलं कुटुंब रस्त्यावर आलं. घरातील वयोवृद्ध
आजोबांवर कुटुंबाची जबाबदारी आली. विशेष म्हणजे प्रशांत तेंव्हा तिसरीतच होता. त्याने
आपल्या स्वरचित कवितेतून शेतकरी दादाला आत्महत्या न करण्याची आर्त साद घातली.
शेतकऱ्यांच्या कष्टाची कैफियत शब्दबद्ध केली. त्याचे दुर्दैवं असे त्याने कविता
ज्या दिवशी सादर केली, त्याच रात्री त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती.
ही बातमी वाऱ्यासारखी
समाजात पसरली. वर्तमानपत्रात टिव्ही चैनल वर बातम्या आल्या. समाजातील अनेक लोकांनी
हळहळ व्यक्त केली. काहींनी मदतीचा हात पुढे केला, तर काहींनी फक्त
पोकळ आश्वासने दिली.
या सर्वांमध्ये एक
फोन येऊन गेला. अनोळखी माणूस तिकडून बोलत होता व मला आधार संस्थेची माहिती सांगत
होता. सर आम्ही समाजातील अनाथ, वंचित पिडीत, शोषित मुलांना
दत्तक घेतो. त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारतो. जोपर्यंत ही मुलं शिकतात
तोपर्यंत आधार ही संस्था त्यांना आधार देण्याचे काम करते.
खरंचच विचार केला तर
आधार म्हणजे काय हो? वंचित, शोषित, पीडितांना जगण्याची उमेद देणे म्हणजे आधार. त्यांना जीवनमार्ग दाखवणे
म्हणजे आधार. त्यांच्या मनगटामध्ये कष्टाचे आणि मेंदूमध्ये सद्विचारांचे बळ भरणे
म्हणजे आधार. ही सर्व कामे आधार ही संस्था अगदी निरपेक्षपणे, निस्वार्थीपणे
पार पाडत आहे. गेल्या वर्षी आधार संस्थेने स्व.मल्हारी बटुळे यांच्या लेकरांना
दिवाळी भेट व शैक्षणिक साहित्य पुरवले होते. या वर्षी दहा दिवसांपूर्वी रोख सात
हजार रुपये आधार संस्थेने पाठवले. या पैशांमधून प्रिती, प्रमोद आणि
प्रशांत यांना शैक्षणिक साहित्य, कपडे, शूज, अवांतर वाचनाची पुस्तके, स्पर्धा
परीक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तके देण्यात आली. या होतकरू लेकरांना आधारने दत्तक
घेतले आहे.
समाजातील वंचितांचा,
पिडीतांचा
आपण आधार बणूया. हा उदात्त, निर्मळ आणि प्रामाणिक विचार घेऊन आधार
संस्थेमधील सर्व सदस्य निरपेक्षपणे काम करताहेत. त्यांना ना प्रसिद्धीची हाव आहे,
ना
मानसन्मानाची. त्यांचे स्थान गरजू विद्यार्थ्यांच्या काळजामध्ये कोरले आहे. जिथे
गरज आहे तिथपर्यंत आधार पोहोचत आहे. प्रति महिना फक्त १०/- रुपये याप्रमाणे १२०/-
रुपयांत एक वर्षाची मेंबरशिप आपल्यालाही घेता येते व ती आपण घ्यावी ही नम्र
विनंती. या मदतीतूनच गरजू लेकरांना आधार देण्याचं काम आधार ही संस्था करत आहे या
संस्थेच्या मदतीतूनच अनेक विद्यार्थी घडले आहेत, घडत आहेत व
भविष्यातही घडतील.
आधार संस्थेला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. बटुळे
कुटुंबातील लेकरांच्या आयुष्यात आपण निर्माण केलेला प्रकाश एक दिवस नक्कीच चमकणार
आहे. आपले पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.
भगवान विद्यालय खरवंडी ता-पाथर्डी, अहमदनगर या
विद्यालयात
प्रशांत- पाचवी
प्रमोद- सातवी
प्रिती- नववी
या वर्गात शिक्षण घेत आहेत.
✍️श्री.लहू बोराटे सर.
Friday, December 3, 2021
"शुभम संजय वाघ आधारच्या मदतीने आय टी आयला दाखल..."
वडील लहानपणी वारलेले.आई मजुरी करुन कशीबशी कुटुंब चालवायची. मोठा मुलगा कॉलेजला जाऊ लागला. आता मुलांचा आधार मिळेल.आईला खूप बरं वाटायचं. पण अचानक मोठ्या मुलाचा मित्रांकडून घात झाला. आभाळच कोसळलं... नव-याच्या धक्यातून बाहेर यायच्या आतच मुलाचा दुसरा धक्का बसला, अन् आईवर मानसिक परिणाम झाला.
आई संगिता हीस श्रीरामपूर येथील डॉ. उंडे यांचा उपचार चालू असून दर महिन्याला दोन ते अडीच हजार रूपये खर्च येतो. शुभम सुट्टीत शेतात मिळेत ते काम करून थोडेफार येणाऱ्या पैशात कुटुंब चालवून शिक्षणही घेत आहे. आईच्या मानसिक असंतुलनामुळे घरी आल्यावर स्वयंपाक करण्यासाठी त्याला वयोवृद्ध लिलावती आजीला मदत करावी लागते.
परवा मदत घेण्यासाठी आजीही शुभम सोबत आली होती. "सर, शुभमला स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे.. असं काही पुण्याचं काम करा.. लई उपकार होतील." हे सांगताना तिची मान डुगडुग करत होती." बोलताना तिचा आवाज कापत होता, डोळ्यात अश्रू होते. मी आजीला व शुभमला धीर दिला.
अमृतवाहिनी आयटीआयचे प्राचार्य एस टी देशमुख यांनी शुभमची परिस्थिती समजून घेतली. त्याला फिटर ट्रेडसाठी प्रवेश दिला.ते शुभमला "अर्न अँड लर्न" योजनेत सहभाग देणार आहेत. उरलेल्या फी बाबत शिष्यवृत्ती मिळवून देणार आहेत.
इतर सहकार्य करणार असल्याची माहिती प्राध्यापक बाळासाहेब आहेर यांनी दिली.शुभम अत्यंत संघर्षात १२ वी झाला असून शेतात मिळेल ते काम करुन कुटुंब चालवत आहे.
आधारने नुकतेच शुभमला दत्तक घेतले असून अमृतवाहिनी आय टीआय कॉलेजला प्रवेश दिला आहे.
शुभमच्या प्रवेशासाठी आधार फाऊंडेशन संस्थेने नुकताच *दहा हजार रुपयांचा चेक* दिला. वह्या,सॅक,आदी साहित्य दिले.
शुभमला तिगाव ते अमृतवाहिनी कारखाना, अमृतनगर हे २५ किलोमिटर अंतर ये-जा करायचे आहे. एसटीचा संप असल्याने दररोज त्याचा ९० रु खर्च कसा करावा हाही प्रश्न आहे.
पण शुभम अत्यंत समजदार आहे.संघर्ष करायची त्याची तयारी आहे. जिद्द अन् प्रयत्नांची पराकाष्ठा करत आधारच्या साथीनं त्याला आपण बळ देऊया.. माणूसपण जपत त्याच्या पंखात बळ देऊया.
Friday, October 22, 2021
"आधार दत्तक योजनेतील विद्यार्थ्यास नवीन सायकल भेट दिली"
आज आधार शैक्षणिक दत्तक पालक योजने अंतर्गत श्रमिक ज्युनियर कॉलेज,संगमनेर येथे 12वी वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या
हुजैफ असिफ शेख या विद्यार्थ्याला गुरुकुल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा,आदर्श शिक्षिका सौ.वृषाली कडलग मॅडम यांनी नवीन सायकल भेट दिली.
याप्रसंगी आधार फाउंडेशन चे समन्वयक डॉक्टर महादेव अरगडे, पी. डी. सोनवणे सुखदेव इल्हे आदि उपस्थित होते.
धन्यवाद मॅडम
"बाल मूर्तिकार रेवणनाथ नवलेला आधारने घेतले दत्तक"
तालुक्यातील मालदाड येथील बाल मूर्तिकार रेवणनाथ नवले या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर नुकताच प्रसारित झाला.
त्यामध्ये हा विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून शैक्षणिक अध्ययनापासून वंचित असल्याचे सांगण्यात आले.
कारण कोविड-१९ या आजाराच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण चालू आहे.
भूमीहीन असणारे,अपघाताने दिव्यांग झालेली वडील सध्या काम नसल्याने घरीच आहेत. आई मोलमजुरी करते, अशात अँड्रॉइड मोबाईल घेण्यासाठी पैसे कुठून आणणार?
घरात खाणारी तोंड पाच अशाही परिस्थितीत उपजतच शिल्पकलेचे ज्ञान अवगत असलेला रेवणनाथ हा त्यांचा मोठा मुलगा इयत्ता सहावीत शिकतोय वयाने लहान असला तरी फोटो पाहून हुबेहूब मूर्ती बनविण्याचे कसब त्याच्या अंगी आहे
जणू काही एखादा निष्णात कलाकारच मूर्तिकार असावा, अशा मूर्ती स्वतःच्या हाताने कोणतेही यांत्रिक साहित्य न वापरता तो तयार करतोय, रंगवतोय.
याची चाहूल त्याच्या मुख्याध्यापकांना गृह भेटीदरम्यान लागली. त्यांनी मूर्ती बनवत असतानाचा एक व्हिडिओ तयार करून समाज माध्यमावर अपलोड केला.
त्यानंतर हा व्हिडिओ आधारचे शिलेदार बाळासाहेब गडाख व आधारचे समन्वयक अनिल कडलग यांच्या पाहण्यात आला.
त्यांनी आधार समन्वयकांशी चर्चा करून सुरुवातीला त्याच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे सुचवले.
सर्व परिस्थिती समजावून घेत आधार समन्वयकांनी या विद्यार्थ्यांची आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेसाठी निवड केली.
त्यानंतर कॉर्नर मोबाईल शॉपीचे संचालक संजय अभंग यांच्या सहकाऱ्याने आधार फाउंडेशनने रेवननाथला ऑनलाईन शिक्षणासाठी एक अँड्रॉइड मोबाईल घेतला.
तसेच शालेय उपयोगी साहित्य, स्कूल बॅग, गणवेश, शूज आदि साहित्यासह आधार समन्वयकांनी रेवणनाथचे घर गाठले.
सोबतच शिल्पकार सुनील मादास हे ही होते. त्यांनी या बाल मूर्तिकारांची शिल्पकला पाहून त्याला त्याच्या आयुष्यात शिल्पकार बनण्यासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींसाठी मदत करण्याचं जाहीर केलं.
आधारची ही भेट पाहून रेवणनाथसह त्याचे कुटुंबीय भारावून गेले. आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेअंतर्गत रेवणनाथच्या पुढील शिक्षणाची सर्व जबाबदारी आधार फाउंडेशनने उचलली आहे.
यासाठी आधारचे मार्गदर्शक साहेबराव नवले यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.आणखी काही सामाजिक संस्थानी मदत केल्यास गरजू व होतकरू कुटुंबाच्या प्रगतीसाठी रेवणनाथ भविष्यात नक्कीच उंची गाठू शकेल.
याप्रसंगी आधारचे समन्वयक सोमनाथ मदने, अनिल कडलग, बाळासाहेब गडाख, सुनिल मादास,सुखदेव गाडेकर,सरपंच गोरक्ष नवले,
श्रमशक्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास डोंगरे, गोपीनाथ नवले, निलेश नवले, सचिन नवले, जालिंदर नवले यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
"इंजिनिअर गायत्रीला मिळाला लॅपटॉप, शिक्षणातील अडथळा झाला दूर."
"आधार संगमनेर व नाशिक आधारने दिला आधार"
Apex computer चे संचालक लांडगे साहेब व मोठी बहीण दिपाली या सर्वांच्या सहकार्याने सेकंड हँड सोनी कंपनीचा कोअर आय 5 लॅपटॉप खरेदी केला.
*आधार फाउंडेशन संगमनेर*
----------------------------------------
"आधार फाऊंडेन संगमनेर आणि पी. एस. आय. मा. मृणाल पवार साहेब" यांच्या अनमोल मदतीने आधार दत्तक पालक योजनेअंतर्गत इंजिनियरिंग द्वितीय वर्षात शिकणारी माझी बहीण गायत्री रामनाथ सोनवणे हिला लॅपटॉप देण्यात आला.
गायत्रीची गरज लक्षात घेता आधारने अगदी कमी वेळेत लॅपटॉप उपलब्ध करून दिला. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
आधार परिवाराची सोनवणे कुटुंबाला पावलोपावली साथ मिळते. आधारने केलेल्या अनमोल मदतीसाठी आमचे शब्द देखील कमी पडतील.
पुन्हा एकदा आधार समन्वयक आणि समुपदेशन ग्रुपचे मनापासून आभार.
दिपाली सोनवणे.
संगमनेर
--------------------------------------
दिपाली आधार कार्यालयात काम करते. ती एम. कॉम पुणे विद्यापीठ गोल्ड मेडलिस्ट असून विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे.
मोठी बहीण मोनाली MSc Bed. देवकी-B.com तर सोनाली M.Farm झाली असून Phd साठी पात्र झाली आहे. पण पैशांअभावी ती पीएचडी पूर्ण करु शकत नाही.
वेल्डींग काम करत असलेले वडीलांचे चार महिन्यापूर्वी हदय विकाराने निधन झाल्याने सोनवणे परिवारावर फार मोठा आघात झाला होता. मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचे रान करणारा बाप.घरातील एकमेक कर्ता माणूस गेल्यावर पाच बहिणी एक भाऊ व आई अशा परिवाराला आधाराची गरज होती.
अत्यंत प्रतिभावान बहिणी़ची दखल आधारने घेतली. दिपाली आता आधारमध्ये सात हजार मानधन घेत काम करते.सोनाली बी फार्म सी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी करते.
गायत्रीला नाशिकच्या आधारने शैक्षणिक दत्तक घेतले .तर विजयची जबाबदारी आधार संगमनेरने घेतली आहे.
गायत्रीच्या लॅपटॉपसाठी आपण अनेक संस्थांना अवाहन केले होते.पण प्रतिसाद आला नाही.
गायत्रीला प्रोग्रामिंगसाठी लॅपटॉपची खूप गरज होती. आधार समुपदेशक डॉ. चित्रलेखा देशमुख, वैशाली देशमुख,डॉ. महादेव अरगडे, पी डी सोनवणे, अनिल कडलग, सोमनाथ मदने,लक्ष्मण कोते, सुखदेव इल्हे इ समन्वयक यांचे उपस्थितीत गायत्रीला लॅपटॉप दिला.
गायत्रीला लॅपटॉप मिळताच, तिची कळी खुलली. बहीण दिपाली सुखावली. मागील वर्षी खूप अडचणी असताना गायत्रीला 9.11 रँक मिळाली. यावर्षी ती *टॉपर* राहील यात शंका नाही.
शब्दांकन-सुखदेव इल्हे, आधार
"कृषीतंत्र शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आधारने दिली मदत"
विशाल रामदास इल्हे.
मु. पो. तळेगाव दिघे. ता- संगमनेर
(ABM 3rd year)
Agriculture Business Management
आई- मजूरी तर वडील रस्त्यावर चप्पल शिवण्याचे काम करतात.
विशाल १२वी पासुन आधार दत्तक पालक योजनेतून शिकतो.
गेली तीन वर्षापासून विशाल एका कृषी दुकानात पार्ट टाईम काम करतो.
त्यामुळे घराला व शिक्षणाला हातभार लागतो.
तृतीय वर्षे नुकतेच सुरु झाले असून कॉलेज फी भरण्यासाठी विशालला १०,०००₹ परतफेडीची मदत म्हणून दिली.
कुठल्याही प्रकारचे चार्ज न घेत . शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही मूलं घेतलेली मदत परत करणार आहेत.
विशालला पूढील शिक्षणासाठी शुभेच्छा.
"अत्यंत होतकरू भावी शिक्षकेस आधारने दिला आधार"
कल्पना मनोहर कोकणे.
मु. पो. धांदरफळ खुर्द, ता - संगमनेर .
Bsc.Bed द्वितीय वर्ष
अत्यंत होतकरू भावी शिक्षिका.
वडील नाहीत. परिस्थितीमूळे भावाचे शिक्षण अर्धवट राहिले.
आई मजुरी करून घर चालवते.भाऊ मालपाणीमध्ये काम करतो.
आधारने तीन वर्षांपासून तिला दत्तक पालक योजनेत शिक्षणासाठी मदत दिली.
आज दुसऱ्या वर्षाच्या फी साठी
आधारने नुकताच 5000 ₹ चा चेक,वह्या, पेन,सॅक आदी मदत करत प्रोत्साहन दिले.
कल्पनाने आधीच ठरविले की, नोकरीला लागले की , पहिली मदत आधारला करणार.
तीन वर्षापुर्वी एस वाय बीएस्सी ला 81% असूनही कॉलेज बंद करण्याची वेळ तिच्यावर आली होती .
कल्पना
भावी शिक्षिकेसाठी आधारच्या खूप खूप शुभेच्छा
.
"चिन्मयला आधार मिळाला.. शिक्षण पुन्हा सुरु झाले"
चिन्मय विजय परदेशी
AISSM POLYTECHNIC College Pune
येथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा करत आहे. वडील वयोवृद्ध असून एका खाजगी कंपनीत सेवा केल्याने एक हजार पेंशन मिळते.
सदर परिवार सोमवार पेठ, पुणे येथे येथे राहते.शेजारी केईएम हॉस्पिटल आहे. चिन्मयची आई वैशाली परदेशी पेशंटचे डबे तयार करायच्या, कुटुंब चालायचे.
पण गेल्या आठ महिन्यापुर्वी वैशाली ताई पडल्या. मनक्याचे आपरेशन सह्याद्री हॉस्पिटलमध्ये झाले. खूप खर्च झाला. आर्थिक गणित कोलमडून गेलं. जगणचं मुस्कील झालं..
चिन्मयपुढे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कसे करावे हा प्रश्न निर्माण झाला. आईला उठता येत नाही. ती डबे करू शकत नाही. पैसे भरले नसल्याने चिन्मयचे कॉलेज बंद झाले.
चिन्मय परदेशी याचा अर्ज आधार सदस्य हरीभाऊ खामकर साहेब यांचे माध्यमातून नुकताच प्राप्त झाला. परिस्थितीची खात्री केली.
आधार कोअर कमिटीची संमती मिळताच ,आज 8000 ₹ आरटीजीएस करत या गरजू मुलाला उपलब्ध करून दिले.
एक गरजू मुलगा शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाताना वाचला. एका कुटुंबाला आधार मिळाला.
चिन्मय एक जिद्दी मुलगा आहे. मागच्या सेमिस्टरला त्याला 81%मिळाले होते. "सर, मुलगा नोकरीला लागला की, आधारचे सर्व पैसे परत करील".
आधार कठीण प्रसंगी माझ्या पाठीशी उभा राहिला, कुणीच मदत करीत नव्हते.
आधारच्या रूपाने पांडुरंग धाऊन आला... हे सांगताना वैशालीताई यांचा आवाज कंप पावला होता. डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते.
चिन्मयच्या भावी जीवनासाठी हार्दीक शुभेच्छा.
सुखदेव इल्हे,आधार समन्वयक.






